औरंगाबाद

ममता मेमोरियल हॉस्पिटलची मान्यता रद्द, जिल्हाधिकऱ्यांचे आदेश

बिल न भरण्यावरून ५ तास मृतदेह ठेवला होता रोखून

औरंगाबाद/प्रतिनिधी
वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर येथील ममता मेमोरीयल कोरोना हेल्थ सेंटर बेकायदेशीर रित्या सुरु असून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची लूट सुरु असून योग्य उपचार देण्यात येत नाही असा आरोप रुग्ण न्याय हक्क परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे करण्यात आला होता. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी समिती गठीत करून समितीच्या अहवालात दोषी आढळलेल्या रुग्णालयाची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
ममता मेमोरियलचे संचालक डॉ. सुदाम चव्हाण हे सर्व नियम धाब्यावर बसवून हॉस्पिटल चालवत आहेत. कोरोना रुग्णालय सुरु करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या नसताना देखील सुरु आहे. तसेच येथून रुग्णाची मोठ्या प्रमाणावर लुट होत आहे. या हॉस्पिटलला जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे अभय असल्याने हा सर्व बाजार सुरु असल्याचे देखील बनसोड यांनी निवेदनात म्हटले होते.  त्यानुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी डॉ कुडलीकर, डॉ वाघ, डॉ. दाते व डॉ बामणे समिती स्थापन करून चौकशी करण्यात आली. या चौकशीत संबंधित हॉस्पिटल दोषी आढळून आल्याने हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्यात आली आहे अशी माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उल्हास गंडाळ यांनी दिली.अशा प्रकारे मान्यता रद्द होणारे हे पहिले हॉस्पिटल आहे.

सोमवारी एका कोविड रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर पैसे न भरल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना मृतदेह देण्यास मनाई केली होती. नातेवाईकांनी विनवण्या करून सुद्धा हॉस्पिटल प्रशासनातर्फे नातेवाईकांना धमकावण्याचा प्रकार सुरु होता. तब्बल पाच ते सहा तासानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटवण्यात आला.

आम्ही कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. आमच्याकडे येणारे रुग्ण हे परिसरातील गरीब रुग्ण आहे आम्ही त्यांना सेवा देण्याचे काम करत आहोत. कोरोनासारख्या कठीण काळात आम्ही आमचा जीव धोक्यात घालून रुग्णाची सेवा करत आहोत. आम्ही कोणतेही जास्तीचे बिल आकारले नाही अधिकाऱ्यांनी चौकशी केली असून त्यात सर्व नियमाप्रमाणे असल्याचे समोर आले आहे.
डॉ. सुदाम चव्हाण, ममता मेमोरियल हॉस्पिटल, बजाजनगर दिली.

ममता हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर सुदाम चव्हाण यांनी आतापर्यंत रुग्णावर चुकीच्या पद्धतीने ट्रीटमेंट केल्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. अनेक रुग्णाकडून खंडणी सारखे लाखो रुपये उकळले.  त्याच्या चुकीमुळे अनेक रुग्ण दगावले असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच त्यांच्या संप्पतीची चौकशी करावी.
यशवंत शिरसाट, संघटना प्रमुख ,रुग्ण न्याय हक्क परिषद महाराष्ट्र राज्य

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close