औरंगाबाद

आमदार बंब यांनी उभारले 100 खाटाचे कोविड हॉस्पिटल

गंगापूर/ महंमद तंबोली

अवघ्या दहा दिवसांत आमदार प्रशांत बंब यांनी मतदारसंघातील लासूर स्टेशन येथे शंभर खाटांचे सुसज्ज असे कोविड हाॅस्पीटल उभारले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आॅस्किजन बेडची कमतरता पाहता राज्यात ठिकठिकाणी कोरोना सेंटर, हाॅस्पीटल उभारण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी, स्वंयसेवी संस्था पुढे येत आहेत. राज्यात  सत्ताधारी विरुद्ध भाजप या दोन पक्षांमध्ये यावरून राजकारण देखील सुरू आहे. पण अशा परिस्थितीतही दोन्ही पक्षांकडून कोरोनाशी लढा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न होतांना दिसत आहेत. गंगापूर-खुल्ताबादचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी मतदारसंघातील लासूर स्टेशन येथे शंभर खाटांचे सुसज्ज असे कोविड हाॅस्पीटल उभारले आहे.


विशेष म्हणजे अवघ्या दहा दिवसांत आॅक्सिजन युक्त तसेच ३० आयसीयू बेडचा समावेश असणारे शंभर खाटांचे  हे रुग्ण्लाय उभारण्यात बंब व त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले  आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणा वाढत आहेत. सुरवातीला शहरी भागात कोरोना संसर्ग अधिक होता, मात्र आता ग्रामीण भागात देखील याचे लोण मोठ्या प्रमाणात पसरले आहे. तर दुसरीकडे रुग्णांना उपचारासाठी आॅक्सजिन, बेड मिळत नसल्याची परिस्थिती. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार, त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची सुरू असलेली धडपड पाहता ग्रामीण भागातच कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार होणे आजच्या घडीला महत्वाचे होते. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस जे.पी.नड्डा यांनी नुकतेच मराठवाड्यातील भाजप आमदार, खासदारांना कोरोना रुग्णांसाठी शक्य ती मदत उभी करण्याचे आवाहन केले होते. आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या मतदारसंघात याची सुरूवात आधीच केली होती. प्राथमिक उपचार करणारे कोविड सेंटर न उभारता जोखमीच्या रुग्णांना आॅक्सजिन, व्हेंटीलेटर, आयसीयूची सुविधा देता येईल असे सुसज्ज असे हाॅस्पीटल उभारण्याचा संकल्प बंब व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता. त्यामुळे त्यासाठी योग्य अशा इमारतीचा शोध घेतांना त्यांना लासूर स्टेशन येथील जैन मंगल कार्यालयाची तीन मजली इमारत उपलब्ध झाली. मनासारखी जागा मिळाल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत बंब व त्यांच्या सहकाऱ्यांनी एका परिपुर्ण कोविड रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय उपकरण आणि साधनांची जमवाजमव केली. प्रत्येक बेडपर्यंत आॅक्सिजन पुरवण्यासाठीची सेंट्रलाईज आॅक्सिजन सिस्टिम बसवण्यात आली. काल या रुग्णालयाचे संपुर्ण काम संपले. शंभर पैकी ३० बेड हे आयसीयुचे म्हणजेच व्हेंटिलेयर युक्त असणार आहे. गंगापूर तालुक्यातील लासूर सारख्या गावातच शंभर बेडचे सुसज्ज असे कोविड रुग्णालय आजपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता तालुक्यातील रुग्णांना कोरोनावरील उपचारांसाठी बेडसाठी शहराकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही. वेळेत उपचार मिळाले नाही म्हणून एखादा रुग्ण दगावला असे प्रकार घडू नये असा,आमचा प्रयत्न असल्याचे आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close