नाशिक

आंदोलनाचा हा वणवा केंद्र सरकारला नेस्तनाबूत करेल – ना. बाळासाहेब थोरात

कृषी कायद्याविरोधात कोल्हापुरात काँग्रेसची विशाल ट्रॅक्टर रॅली, हजारोंचा सहभाग

संगमनेर/अमोल भागवत

केंद्र सरकारने आणलेले शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसचे आंदोलन सुरुच असून आज कोल्हापुरात भव्य ट्रॅक्टर रॅली काढून विरोध आणखी तीव्र करण्यात आला. शेतकर्‍यांचे जीवन उद्धवस्त करणारे हे अन्यायी कायदे रद्द करेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, शेतकर्‍यांच्या या संघर्षाची मशाल पेटवली आहे. या पेटलेल्या वणव्यात केंद्र सरकार नेस्तनाबूत होईल असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात आज विशाल ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. या रॅलीत हजारो ट्रॅक्टरसह शेतकर्‍यांनी भाग घेतला. निर्माण चौकातून सुरु झालेल्या या रॅलीची सांगता दसरा चौकात झाली. त्यानंतर सभा झाली. या सभेत एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यमंत्री विश्वजित कदम, राज्यमंत्री सतेज पाटील, आ. पी. एन. पाटील, चंद्रकांत पाटील, राजू आवळे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सोनल पटेल, वामसी रेड्डी, मा. आ. मोहन जोशी, पृथ्वीराज साठे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, केंद्रातील सरकारने घाईघाईने हे कायदे मंजूर केले. विरोध करणार्‍या खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. हे कायदे शेतकर्‍यांच्याच विरोधातील नाही तर तुमच्याही विरोधातील आहेत. मुठभर व्यापारी, साठेबाज, नफेखोर, भांडवलदार यांच्या हितासाठी हे कायदे बनवले आहेत. या कायद्याने शेतकर्‍यांचा माल स्वस्तात खरेदी करुन व्यापारी साठेबाजी करणार आणि महागात लोकांना विकणार. या कायद्यात आधारभूत किंमतीची व्यवस्थाच ठेवलेली नाही. काँग्रेसच्या सरकारने आणलेले शेतकरी, कामगारांच्या हिताचे कायदे भाजप सरकारने संपुष्टात आणले आहेत. फक्त व्यापारी, भाडंवलदार, लोकांच्या हिताचे विचार करणारे हे सरकार आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी 2 कोटी सह्यांची मोहीम राबवण्यात येत आहे यात एकट्या महाराष्ट्रातून 50 लाख शेतकर्‍यांच्या सह्या झालेल्या आहेत. थोरात पुढे म्हणाले की, जातीयवादी, धर्मांध शक्तींना सत्तेपासून दूर ठेवत राज्यात तीन पक्षाने एकत्र येऊन माणूस हा केंद्र मानून सरकार स्थापन केले आहे. एक वर्षाच्या काळातच महाविकास आघाडी सरकारने चक्रीवादळ, कोरोना, विदर्भातील पूर आणि नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या संकटाचा सामना केला परंतु शेतकरी व जनतेला मदतीचा हात देण्यात कधीच मागपुढे पाहिले नाही. सत्तेवर येताच शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली. विदर्भातील महापुरात मदत केली आता अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीसाठी तातडीने 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले परंतु आधीच्या फडणवीस सरकारने कोल्हापुरला मागच्या वर्षी पूर आला त्याचे पैसे कधी दिले असा सवालही त्यांनी विचारला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close