अमरावती

५२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये!

पडघम : २९ ग्रामपंचायतींमध्ये प्रभागरचना अंतिम करण्याची कार्यवाही

अमरावती / सचिन ढोके

जिल्ह्यातील एप्रिल ते जूनदरम्यान मुदत संपलेल्या ५२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवाय माहे जुलै ते डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक विभागाने सुरू केली आहे.

जिल्ह्यातील ५२४ ग्रामपंचायतींच्या एप्रिल ते जून दरम्यान मुदत संपली आहे. सदर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया मार्च महिन्यात सुरू झाली होती. यासाठी १६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज व छाननीची प्रक्रियादेखील पूर्ण झाली होती. परंतु, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. आयोगाने कोरोनाबाबतच्या सद्यस्थितीसंदर्भात ग्रामपंचायतनिहाय माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून मागविली होती. सदर माहितीचा अहवाल जिल्हा निवडणूक शाखेने आयोगाकडे सादर केला. त्यामुळे येत्या नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनंतर ५२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता निवडणूक विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

याशिवाय जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या २९ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींसाठी प्रभागरचना आणि आरक्षण निश्चितीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यानुसार उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर प्रभागरचना आणि त्यातील प्रभागाच्या आरक्षणाची प्रक्रिया २७ ऑक्टोबरपूर्वी अंतिम केली जाईल. त्यानंतर तो अहवाल त्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार असून, पडताळणीअंती ते त्याच दिवशी त्यावर स्वाक्षरी करतील. पुढे २ नोव्हेंबर रोजी हा अहवाल म्हणजेच निवडणूक असलेल्या प्रभागांची रचना व आरक्षणांची स्थिती घोषित केली जाईल.

जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या अहवालानुसार नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ७, चिखलदरा ६, अचलपूर ४, धारणी ३, दर्यापूर, भातकुली, धामणगाव रेल्वे, तिवसा तालुक्यांतील प्रत्येकी २, तर चांदूर रेल्वे तालुक्यातील १ याप्रमाणे २९ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याचे संकेत सूत्रांकडून प्राप्त होत आहेत.

या ग्रामपंचायतींत प्रभागरचना सुरू

जिल्ह्यातील जुलै ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणाऱ्या २९ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींसाठी प्रभागरचना आणि आरक्षण निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यातील वझ्झर, पांढरी, मल्हारा, म्हसोना, धारणीमधील रंगुबेली, हिराबंबई व चेंडो, चिखलदरा तालुक्यातील काकादरी, खटकाली, अढाव, माखला, खिरपाणी व आमझरी, धामणगाव रेल्वे तालुक्यातील उसळगव्हाण व नायगाव, चांदूररेल्वे तालुक्यातील येरंड, दर्यापूरच्या रामतीर्थ व रुस्तमपूर, नांदगावमधील जळू, कंझरा, बेलोरा, हिरापूर, वडुरा, फुलआमला, पळसमंडळ व शिरपूर, तिवस्यामधील रेवसा ,मार्डी व दिवानखेड आणि भातकुलीमधील विर्शी, बोरखडी आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close