औरंगाबाद

जि.प.शाळांमध्ये पटसंख्या व अंतराची अट न लावता ५ वी व ८ वी चे वर्ग नैसर्गिक वाढ म्हणून जोडा

प्राथमिक शिक्षक समितीची मागणी

Spread the love

खुलताबाद / प्रतिनिधी

बालकांच्या व मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम -२००९ मधील तरतुदी आणि शाळांच्या रचनांचे निकष लक्षात घेता इयत्ता १ ली ते ५ वी प्राथमिक आणि इयत्ता ६ वी ते ८ वी उच्च प्राथमिक संरचना मान्य केली आहे. १९८६ च्या शैक्षणिक धोरणानेच इयत्ता १ ते ५ प्राथमिक आणि इयत्ता ६ ते ८ उच्च प्राथमिक अशी संरचना निश्चित केली होती. मात्र महाराष्ट्रात इयत्ता १ ते ४ प्राथमिक आणि इयत्ता ५ ते ७ उच्च प्राथमिक रचना १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडे दुर्लक्ष करून कायम ठेवल्या गेली. शिक्षणहक्क कायद्याच्या अंमलबजावणी नंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांची इयत्ता १ ली ते ४ थी, १ ली ते ५ वी, १ ली ते ७ वी आणि इयत्ता १ ते ८ वी अशी रचना अस्तित्वात आहे. शिक्षण हक्क कायद्यामध्ये नवीन प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी त्या परिसराच्या १ कि.मी. परिघात इयत्ता १ ते ५ वी असणारी शाळा उपलब्ध नसावी आणि प्राथमिक शाळा प्रवेश वयोगट ६ ते ११ चे किमान २० विद्यार्थी असावेत असे नमूद आहे. मात्र इयत्ता १ ली ते ४ थी चे वर्ग अस्तित्वात असणाऱ्या प्राथमिक शाळेत ५ वी चा वर्ग जोडण्यासाठी नजिकच्या शाळेपासून अंतराची किंवा पटसंख्येच्या कोणतीही अट नाही कारण शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक वर्गाची रचनाच मुळात इयत्ता १ ते ५ अशी आहे. त्यामुळे ५ वी चा वर्ग सुरू करण्यासाठी शासनाकडून कोणत्याही परवानगी ची गरज नसुन नैसर्गिक वाढ असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संघाला व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसार परवानगी देण्यास सक्षम आहे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. ज्या शाळेत इयत्ता ६ वी व ७ चे वर्ग आहेत. अशा ठिकाणी इयत्ता ८ वी चा वर्ग सुरू करण्यासाठी सुद्धा ३ कि.मी. अंतराची किंवा ३५ विद्यार्थी असण्याची अट लागू होत नाही. कारण या ठिकाणी कोणताही नविन ६ ते ८ चा वर्ग होत नसुन सध्या सुरू असलेल्या इयत्ता ६ व ७ च्या वर्गाला नैसर्गिक वाढीमुळे इयत्ता ८ वी चा वर्ग जोडल्या जाणार आहे. नविन उच्च प्राथमिक शाळा अर्थात ६ ते ८ वी ची नविन शाळा सुरू करण्यासाठी इयत्ता ६ वीत जाणारे ३५ विद्यार्थी आणि ३ किमी अंतराची अट असुन नैसर्गिक वाढीने ७ वी च्या सुरू करणाऱ्या वर्गाला जोडून ८ वी चा वर्ग सुरू करण्यासाठी अंतराची व विद्यार्थी संख्येची अट लागू नसल्याची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची शिक्षण हक्क कायद्यातील तरतूदी लक्षात घेता ठाम धारणा आहे. १९ सप्टेबर २०१९ च्या शासन निर्णयाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना इयत्ता ५ वी आणि ८ वी चे वर्ग नैसर्गिक वाढीच्या तत्त्वाने जोडण्यासाठी जाणीवपूर्वक अडसर निर्माण केला जात आहे. या शासन निर्णयाचा परिणाम जि.प.च्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. असा आरोप शिक्षक समितीने केला आहे. पटसंख्या कमी होण्याच्या कारणावरून शिक्षण अतिरिक्त होत आहे. जिल्ह्यात रिक्त जागा नसल्याच्या कारणामुळे आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांसाठी जागा उपलब्ध नसल्याचा दुष्परिणाम होत आहे. यातून अनेक शिक्षक आपल्या परिवारापासून कित्येक वर्ष दूर आहेत. जर शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार ५ वी आणि ८ वी चे वर्ग जोडले गेल्यास पटसंख्या वृद्धी होऊन शिक्षकांच्या जागा वाढून आंतरजिल्हा बदलीने येण्याचा मार्गही सुकर होईल. यातून अनेक शिक्षकांना त्यांच्या परिवारास दिलासा मिळेल. शासन निर्णय रद्द करून शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसार इयत्ता ४ थी च्या शाळेला इयत्ता ५ वी आणि इयत्ता ७ वी च्या शाळेला इयत्ता ८ वी चा वर्ग जोडण्यासाठी अंतर किंवा किमान विद्यार्थी संख्येची कायद्यात कुठेही नसणारी अट न लावता परवानगी द्यावी. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या बाबतीत वर्ग जोडण्याची परवानगी देण्याचे अधिकार प्राथमिक संचालक यांच्या ऐवजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेच कायम ठेवावे. त्यामुळे मान्यतेची आणि प्रवेशप्रक्रिया सुलभ होण्याची कारवाई तात्काळ होऊ शकते तरी जिल्हा परिषदेच्या शाळांना वर्ग ५ वी व ८ वी चे वर्ग तात्काळ जोडण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, सरचिटणीस विजय कोंबे,राज्यनेते काळूजी बोरसे पाटील, शिक्षक नेते शिवाजी साखरे, उपाध्यक्ष राजन कोरगांवकर, कार्याध्यक्ष राजेंद्र नवले, कोषाध्यक्ष केदु देशमाने, संगठक सयाजी पाटील, कार्यालयीन चिटणीस शिवाजी दुर्शिंग, संपर्क प्रमुख राजेंद्र खेडकर, प्रवक्ते आबा शिंपी, राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर, ऑडीटर राजेंद्र पाटील, न.पा., म.न.पा.आघाडी प्रमुख सुधाकर सावंत, महीला आघाडी प्रमुख वर्षा केनवडे, सचिव नलिनी सोनोने सह विजय साळकर, रंजित राठोड,औरंगाबाद जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close