लोकप्रतिनिधिंनो, तेल्हारा तालुक्याचे अस्तित्व ठेवायचे नाही काय?
तेल्हारा तालुक्यावर सातत्याने अन्याय होत असल्याने तीव्र असंतोष

तेल्हारा/प्रतिनिधी
मागील काही काळापासून तेल्हारा तालुक्यावर सातत्याने अन्याय होत असल्याने तालुक्यावरील अन्याय रोखण्यात आणि तालुक्याला विकासाच्या वाटेवर नेण्यात खालपासून वरपर्यंत चे सत्ताधारी आणि विरोधक सर्वच प्रकारचे लोकप्रतिनिधी सपशेल अपयशी ठरले असून त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. म्हणून आता लोकप्रतिनिधींनो तेल्हारा तालुक्याचे अस्तित्व शिल्लक ठेवायचे नाही काय ?? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
वारी येथील धरणातील पाण्याचा विषय पुन्हा पेटला आहे. अकोला अमरावती बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तेल्हारा तालुक्यातील वान धरनाची निर्मिती तेल्हारा आणि संग्रामपूर तालुक्याच्या शेतीच्या सिंचनासाठी झालेली आहे विशेष. परंतु परिसरातील लोकप्रतिनिधी निष्क्रिय असल्याने आणि इतर परिसरातले लोकप्रतिनिधी सक्रिय असल्याने तेल्हारा तालुक्यावर कायमचा अन्याय होत असून वारंवार वान धरणाच्या पाण्यावर इतर परिसरातून डल्ला मारल्या जात असून आतापर्यंत अनेक पाणीपुरवठा योजनांना मंजुरात मिळवून पाणी आरक्षित करण्यात आलेले आहे. त्यात आता बाळापूर तालुक्यातील 69 खेडी पाणीपुरवठा आरक्षणाची भर पडली आहे.
विशेष म्हणजे तेल्हारा आणि संग्रामपूर तालुक्यात शंभर टक्के सिंचन होत नसताना ह्या दोन्ही तालुक्यात शंभर टक्के सिंचन व्हावे त्यासाठी प्रत्यक्ष शेतापर्यंत पाईपलाईनची योजना प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठीचे प्रयत्न शासनाकडून अपेक्षित असताना याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.
दुसरीकडे सातपुड्याच्या पायथ्याशी असणारी अकोट मतदार संघातील शेकडो गावे अजूनही पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. यातील अनेक गावांमध्ये शुद्ध पाण्याअभावी किडनीच्या आजाराने कित्येक नागरिकांचे जीव गेलेले आहेत. आणि उठसुठ दुसरीकडे पाणी पळविल्या जात आहे. म्हणजेच “तेल्हारा तालुका उपाशी अन दुसरे तुपाशी” असा प्रकार घडत आहे.
तालुक्यावर अन्यायाची ही पहिलीच वेळ नसून तेल्हारा तालुक्याच्या विकासात भर पाडणारा महत्त्वाकांक्षी सीआरपीएफ चा कॅम्प इथून शिसा उदेगाव अकोला येथे पळविला गेला. तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे पॉलीटेक्निक कॉलेज अकोट एवजी मुर्तीजापुरला पळविल्या गेल्याची चर्चा आहे. राज्यात आणि देशात महामार्गांची कामे झपाट्याने सुरू असताना तेल्हारा अकोट मतदारसंघातील बहुतांश रस्ते दयनीय अवस्थेत पोहोचलेले आहेत नूतनीकरणाची कामे रखडलेली आहेत. एकीकडे चिखलदऱ्याला जागतिक दर्जाचे स्काय वॉक तयार होत असून तेल्हारा अकोट तालुक्यातील पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळांच्या विकासाला प्रचंड वाव असून त्यांच्या सर्वांगिन विकासाकडे लक्ष दिले जात नाही. अशा एक ना अनेक विषयात तेल्हारा तालुका सोबत सतत अन्याय होत असून लोकप्रतिनिधींनो तेल्हारा तालुका अस्तित्वात ठेवायचा की नाही असा प्रश्न जनतेच्या तोंडातून निघत आहे.
दोष द्यावा तरी कुणाला ?
गल्ली ते दिल्ली पर्यंत विधानसभा आणि विधान परिषदेचे अनेक आमदार, खासदार, पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, रस्ते मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, जलसंपदा मंत्री, पर्यटन मंत्री, अश्या विविध पदांवर विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि सत्ता असल्याने दोष द्यावा तरी कुणाला? वेगवेगळे विषय वेगवेगळ्या मान्यवरांच्या अखत्यारीत येत असल्याने सर्व एकाच माळेतील मनी असल्याची प्रतिक्रिया सुद्धा नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे.
वानचे आंदोलन तीव्र होण्याचे संकेत
स्थानिक शेतकऱ्यांच्या भावनांची आणि स्वप्नांची राखरांगोळी करून तसेच स्थानिक परिसरातील शेकडो गावे तहानलेली ठेवून येथील पाणीपुरवठा योजनेत त्रुटी काढून दुसरीकडे पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी तात्काळ आरक्षित केल्याने तालुक्यांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला असून वानसाठी मोठे आंदोलन छेडण्याचे संकेत मिळत आहेत. यासाठी सर्वपक्षीय कृती समिती होऊन आंदोलनाचे नियोजन सुरू आहे. शेतकरी आणि तालुक्यातील नागरिक आता आर या पार च्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.