गंगापूर साखर कारखाना १५ कोटी ७५ लाख रूपयांच्या अपहार तीन आरोपी अंतरिम जामीन अर्ज फेटाळला

गंगापुर/प्रतिनिधी
तीन आरोपींचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला, ८ तारखेला अंतिम सुनावनी संपूर्ण गंगापूर तालुक्यातील कामगार, शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागून असलेल्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या गाजत असलेल्या १५ कोटी ७५ लाख रूपयांच्या अपहार प्रकरणात १६ पैकी तीन आरोपींनी दाखल केलेला अंतरिम जामीन अर्ज वैजापूर येथील सत्र न्यायालयाने फेटाळून लावला असून अंतिम सुनावणी ८ डिसेंबरला होणार आहे. यासंदर्भात माहिती अशी की, आ. प्रशांत बंब प्रभारी कार्यकारी संचालकांसह १६ जणांच्या विरोधात १५ कोटी ७५ लाख रूपयांच्या अपहार प्रकरणामध्ये गंगापूर पोलिस स्टेशमध्ये १८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. यातील तीन जणांनी वैजापूर येथील सत्र न्यायालयामध्ये जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जाची सुनावणी आज झाली त्यामध्ये मनोरमा काबरा, विद्या मुनोत आणि पारस मुथा यांच्यावतीने न्यायालयात बाजू मांडताना सांगण्यात आले की, आम्ही इन्कट टॅक्स भरणारे असून गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे सभासद नसून आम्ही संचालक मंडळाचा कुठलाही ठराव केलेला नाही, कारखान्याचे कुठलेही खाते उघडण्यासाठी आमच्या सह्या नाहीत, साखर कारखान्याने पेपरमध्ये केलेल्या आवाहनानुसार पारस मुथा यांनी ६२ लाख रूपये, विद्या मुनोत यांनी ४० लाख रूपये व मनोरमा काबरा यांनी ३० लाख रूपये कारखान्याला कर्जाउ दिले होते. म्हणून त्याच्या व्याजासह एकाला एक कोटी, एकाला ७० लाख व एकाला ५० लाख रूपये कारखान्याकडून परत दिल्याचे भासवण्यात आले. आम्ही आमचे वरील पैसे बँकेत ठेवले असते तर त्यापेक्षा जास्त मिळाले असते. त्यामुळे आम्हाला मिळालेली रक्कम कारखान्याने ८ टक्के व्याजदराने दिली आहे. वरील पैसे कारखान्याने वेळेत न दिल्याने आम्ही कारखान्याला नोटीसा देखील दिल्या होत्या. परंतु चेअरमन आ. प्रशांत बंब यांनी सांगितले की ३१ डिसेंबरच्या आत तुमचे पैसे देतो यावरून आम्हाला वरील रकमा मिळाल्या आहेत. शिवाय मनोरमा काबरा यांच्या भावाचे आपरेशन असल्याच्या वैद्यकीय कारणावरून त्यांना जामीन देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. न्यायालयाने घोटाळ्यात कारखान्याच्या अडकलेल्या मोठ्या रकमेचे गांभीर्य पाहता आरोपींच्या वकिलांचा वरील युक्तीवाद अमान्य करून अंतरिम जामीन फेटाळून या प्रकरणाची अंतिम सुनावणीसाठी ८ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून अड. नानासाहेब जगताप यांच्यासह कृष्णा पाटील डोणगावकर यांच्यावतीने मंगेश जाधव व अॅड. कृष्णा पाटील ठोंबरे यांनी बाजू मांडली. तर आरोपींच्यावतीने अड. सोमनाथ लड्डा यांनी बाजू मांडली.