पदवीधर निवडणुक जिल्हाभर शांततेत,जिल्ह्यातअंदाजे 63.05 टक्के मतदान

औरंगाबाद/प्रतिनिधी
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज सकाळी आठपासून सायं. पाच वाजेपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात घेण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्त आणि नियोजनात ही निवडणूक शांततेत संपन्न झाली. तर या निवडणुकीत अंदाजे 63.05 टक्के पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रशासनाच्यावतीने सर्व व्यवस्था सर्व मतदान केंद्रांवर करण्यात आली होती. जिल्ह्यातील एकूण 206 मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदान प्रक्रियेस सुरूवात झाली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी किल्लेअर्क परिसरातील शासकीय महाविद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. यासोबतच जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्तींनी देखील मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदारांनी देखील कोरोना परिस्थितिचे भान राखत सर्व शासकीय नियमांचे पालन केले. यासोबतच जिल्ह्यातील राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदारांचे मतदान करून घेण्यासाठी धावपळ करताना दिसून आले.