महालगाव परिसरात बिबट्याची दहशत,परिसरात पिंजरा बसविण्याची नागरिकांची मागणी

महालगाव /काकासाहेब पडवळ
ता वैजापूर तालुक्यातील महालगाव परिसरात मागील पाच ते सहा दिवसापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून महालगाव परिसरातील शेतात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. बहुतेक शेतकऱ्यांना तर दररोज बिबट्याचे दर्शन होत आहे.महालगाव परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या वस्तीजवळ तसेच शेतातील पिकांमध्ये व घराजवळ अनेक वेळा दिवसा ढवळ्या शेतकऱ्यांनी बिबट्याला बघितले आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले परतीच्या पाऊसाने नुकत्तीच उघडीप दिल्याने सध्या शेतात कापुस वेचणीसह गहू, कांदाचे रोप व शेतीचे रात्रीचे पिंकांना पाणी देण्यासाठी जावे लागते व ईतर शेतीकामे जोरात सुरु आहे असून,रात्रीच काय परंतु दिवसासुद्धा घराबाहेर निघायची भीती निर्माण झाली आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी वनविभागाला कळविले असता त्यांनी येऊन पाहणी केली या पलीकडे दुसरे काहीही केले नाही.तरी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एखाद्या शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करून जीव घेण्याची वाट न बघता लवकरात लवकर या परिसरात पिंजरा बसवून बिबट्याचा बंदोबस्त करावा असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.