थोरात कारखान्याकडून 100 रु.प्रति टनाप्रमाणे पेमेंट बँकेत वर्ग

संगमनेर/अमोल भागवत
सहकार चळवळीसाठी मार्गदर्शक ठरणार्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सन 2019 – 2020 मध्ये गळीतास आलेल्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांचे दिपावली निमित्त 100 रुपये प्रतिटना प्रमाणे पेमेंट बँकेत वर्ग केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ यांनी दिली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वांवर चालणार्या या कारखान्याने कायम शेतकरी, सभासद व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक यांचा विश्वास जपत कायम उच्चांकी भाव देण्याची परंपरा राखली आहे. या कारखान्याने एक रक्कमी एफआरपी पेक्षा जास्त भाव दिला आहे. 2019 – 2020 मध्ये गळीतास आलेल्या ऊसास यापुर्वी 2530 रुपये प्रतिटन भाव दिला आहे. आता दिपावली निमित्त आणखी 100 रुपये प्रतिटन भाव दिल्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 2630 रुपये भाव मिळाला आहे. कोरोना संकट व आर्थिक महामंदी असतांना ही दिवाळीनिमित्त कामगारांना 20 टक्के बोनस यामधून 5 कोटी 38 लाख 75 हजार तर 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान मधून 2 कोटी 68 लाख रुपये आणि शेतकर्यांच्या ठेवीचे 1 कोटी 48 लाख रुपये देण्यात आले आहे. तसेच कारखान्याच्या सर्व सभासदांना 15 किलो मोफत साखर वाटप सुरु आहे. तसेच सभासदांच्या ठेवी वरील व्याज ही बँकेत वर्ग करण्यात आले आहे. दिपावली निमित्त ऊस पेमेंट 2 कोटी 51 लाख,ठेवींवरील व्याज 2 कोटी आणि बोनस व सानुग्रह अनुदान सुमारे 8 कोटी असे एकूण 12 कोटी 51 लाख रुपये दिवाळी निमित्त बाजारात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकरी,कामगार,व्यापारी वर्ग व बाजारपेठेत आनंदमयी वातावरण निर्माण झाले आहे. कारखान्याचे मार्गदर्शक महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात,अध्यक्ष प्रतापराव ओहोळ,उपाध्यक्ष संतोष हासे, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचे सर्व स्थरांमधून अभिनंदन होत आहे.